पुणे - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने शेवटच्या दिवशी राजाराम बाणखेले यांना उमेदवारी दिली. मंचर शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून बाणखेले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मी पंधरा वर्षांत काय केले अशी टीका माझ्यावर केली जात आहे. तुम्ही तीस वर्षांत काय केले याचा जनतेला हिशोब द्यावा, अशा शब्दांत विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटलांवर माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटलांनी निशाणा साधला. मंचर येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - पिंपरी, चिंचवड अन् भोसरी मतदारसंघात बंडखोरी!
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही आढळराव-पाटलांनी लक्ष केले. मला राज्याने ओळखण्याची गरज नाही. मला माझ्या मतदार संघातील जनता ओळखते, हेच माझ्यासाठी खूप असल्याचे शिवाजी आढळराव-पाटील म्हणाले. दरम्यान, आंबेगाव विधानसभा मतदार संघातून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील विरुद्ध शिवसेनेचे राजाराम बानखेले अशी लढत रंगणार आहे.