पुणे : मुकेश सारडा आणि ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या विश्वस्तांच्या दोन अंतरिम याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. रजनीश ओशो यांचे भक्त त्यांच्या समाधीला भेट देऊ शकतात. तसेच भक्तांना जर दाद मागायची असेल तर ते प्राधिकरण म्हणून धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करू शकतात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
समाधीला भेट देण्याबाबत मनाई करता येत नाही : भक्त आणि रजनीश ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट मधील समाधीच्या ठिकाणी जाण्याबाबतचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहचला होता. त्या संदर्भात सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले की, ज्या अर्थी भक्तांना तेथे जायला मनाई नाही. याचाच अर्थ भक्त समाधीला भेट देऊ शकतात. समाधी स्थळी भेट देणे ही परंपरा असल्यामुळे समाधीला भेट देण्याबाबत कोणालाही मनाई करता येत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.
2022 मध्ये उच्च न्यायालयात सुनावणी : 2022 मध्ये उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की, या ट्रस्टच्या संदर्भात जंगम मालमत्ता आणि बौद्धिक अधिकार जो आहे त्यांचे वाटप होणे बाकी आहे. त्यामुळे त्या संदर्भात कोणत्याही गोष्टी करण्यास प्रतिबंध केलेला होता. म्हणजे अर्थात त्या बाबी करण्यास मनाई होती. परंतु त्याचा अर्थ असा नाही की रजनीश ओशो यांच्या समाधीला भेट देण्यास मनाई आहे. ही बाब रजनीश ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने न्यायालयाच्या समोर मांडली गेली. त्यामुळे 11 ऑगस्ट 2022 चा जो मनाई आदेश आहे तो जंगम मालमत्ते संदर्भात आणि बौद्धिक अधिकाराच्या संदर्भात आहे. परंतु समाधी स्थळी जाण्यापासून अटकाव करणारा नाही ही बाब अधोरेखित करण्यात आली.
भक्त धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागू शकतात : ओशो इंटरनॅशनल विश्वस्त ट्रस्टच्या वतीने वकील पटवर्धन यांनी सांगितले की, तेथे कोणालाही जायला मनाई नाही. परंतु जाण्यासाठी शुल्क भरले पाहिजे आणि माळा घालून जाऊ नये एवढीच बाब यामध्ये आहे. मात्र याचिकाकर्त्यांकडून वकिलांनी मुद्दा मांडला की, भाविकांना जर तिथे ध्यानधारणा करायची असेल, समाधी जवळ जाऊन नमस्कार करायचा असेल तर तिथे जायला मनाई करू नये. तिथे कोणतेही शुल्क आकारू नये. ट्रस्टी यांच्या वतीने वकिलांनी मुद्दा मांडला की, जर भक्तांना असं वाटत आहे काही उल्लंघन होत आहे, तर ते या अनुषंगाने प्राधिकरण म्हणून संबंधित धर्मदायुक्त यांच्याकडे देखील दाद मागू शकतात. दोन्ही पक्षकरांचे मुद्दे ऐकून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, समाधी स्थळी जायला कोणतीही मनाई नाही. परंतु या संदर्भात तुम्हाला काही दाद मागायची असल्यास प्राधिकरण म्हणून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आपण खुशाल जाऊ शकता.
हेही वाचा :