पुणे - पुण्यातील केसनंद येथील महादोबा देवस्थानच्या जागेच्या मालकीचा वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देवस्थानची बाजू ऐकून घेतली नाही. तसेच त्यांनी जुन्या कायद्याचा आधार घेत देवस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकती बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप देवस्थानने केला आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करणार असल्याचा इशारा देवस्थान समितीने दिला आहे.
थेऊर येथील महादेव बाबा देवस्थानाला पेशवेकाळात देवस्थानच्या खर्चासाठी आणि विश्वस्तांच्या उपजीविकेसाठी केसनंद येथील जमीन देण्यात आली होती. सध्या या जमिनीची पाचशे कोटी रुपये एवढी किंमत आहे. राधा स्वामी सत्संग बियासच्या तत्कालीन अध्यक्ष आणि इतरांनी देवस्थानचे तत्कालीन विश्वस्त चंद्रकांत केशव वाघुले यांना फसवून आपल्या नावे केली होती. त्यामुळे देवस्थानचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या जमिनीचे व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, राधा स्वामी सत्संग बियासने ही जमीन एका विकासकाला विकली. याला विरोध देखील करण्यात आला. तसेच संबंधीत विकासकाचे नाव सातबाऱ्यावर नोंद करण्यापूर्वीच हरकती घेण्यात आल्या. मात्र, भ्रष्ट मार्गाने त्या विकासकाला ही जमीन देण्यात आल्याचा आरोप देवस्थान समितीने केला आहे.
देवस्थानची जमीन विकता येणार नाही, असे कागदपत्र असताना आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी त्यात खाडाखोड करून गैरव्यवहार केला, असा आरोप देखील देवस्थान समितीने केला आहे. त्यानंतर आत्ताचे महसूल मंत्री चंद्रकातं पाटील यांनी या प्रकरणात देवस्थानची बाजू ऐकून न घेतला जुन्याच कायद्याचा आधार घेतला. त्यानुसार देवस्थानचे कोट्यवधी रुपयांच्या मिळकती विकासकाच्या घशात घातल्याचा आरोप देवस्थान समितीने केला आहे. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. असे न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी दिला आहे.