पुणे - कोरोना विषाणूशी लढा देण्यास राज्य सरकार सक्षम आहे. राज्याला केंद्राकडे निधी मागण्याची आवश्यकता नाही, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीनुसार काम करत काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, कोरोना या विषाणूशी सामना करण्यासाठी लोकांनी गर्दी टाळावी. लग्न समारंभ शक्य असेल तर पुढे ढकला. जर लग्न पुढे ढकलणे शक्य नसेल तर अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नासारखे विधी आटोपते घ्यावे. परीक्षांच्या ठिकाणीही गर्दी टाळण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
डॉक्टर सतत काम करत आहेत. त्यांना थोडी विश्रांती देण्याचीही गरज असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने होमगार्डस् यांना नियुक्त करण्याचीही सूचना पवारांनी दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घरामध्येच थांबावे. प्रवास टाळला पाहिजे, असे सांगत असताना पवारांनी जनतेला घाबरून न जाण्याचीही दक्षता घेण्याचे सांगितले. नागरिकांनी आपली कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू
महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला पुणे, पिंपरी चिंचवडच्या जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यापुढेही दुकान मालक आणि जनतेने असेच सहकार्य द्यावे असे, आवाहन पवारांनी केले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी लोकल आणि बस सेवा गरजेची आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी कमी केली नाही तर या सेवा बंद करण्याची वेळ येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही गरज पडली तर असेच निर्णय घेतले जातील असे पवार म्हणाले. उद्योजक, खासगी संस्था आणि छोटे व्यापारी यांनी त्यांच्याकडील कामगारांना या दरम्यानच्या काळात किमान वेतन द्यावे, कारण त्यांच्या घरातील चूल रोजच्या उत्पन्नावरच चालते. तेव्हा या निर्णयाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी केली.
हेही वाचा - VIDEO : 'कोरोना'मुळे भारताला मिळतील व्यापारासंबंधी छुप्या संधी; पहा विशेष मुलाखत - भाग ३
मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ हे मुंबईत निर्णय घेत असले तरी विभागीय आणि जिल्ह्याच्या पातळीवरील निर्णय घेण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. त्या २५ टक्क्यांपर्यंत कर्मचारी वर्गावर सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे पवारांनी सांगितले. 'वर्क फ्रॉम होम' ही सवलत शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे, तशीच सवलत खासगी अस्थापनांनी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. खबरदारीचे उपाय फक्त शहरांमध्येच नाही तर ग्रामीण भागातही घेणे आवश्यक असल्याचे सांगताना पवार म्हणाले, ग्रामीण रुग्णालयांमध्येही सर्व सूचना करण्यात आल्या आहेत. तिथे सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आवश्यक खरेदीसाठी आर्थिक निर्बंध हटवण्यात आले असल्याचेही पवारांनी सांगितले.
रुग्णांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करताना अजित पवार म्हणाले, काही ठिकाणी रुग्ण पळून जाण्याचा प्रकार घडला तसे यापुढे व्हायला नको. त्यांनी डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार घेतले पाहिजे. तर वृत्तपत्र, नियतकालिके वाचत असताना दक्षता बाळगण्याचे आवाहन पवारांनी केले. कोंबड्या खाल्ल्याने कोरोना होत नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. तसेच पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याही सतत संपर्कात असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर पोलिसांनी आवाहन केल्यानंतर नमाज पढणारे मुस्लीम बांधवही प्रतिसाद देत असल्याचे पवार म्हणाले.