बारामती (पुणे) - तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम मागील वर्षीपेक्षा उत्तम पद्धतीने चालू असल्याने कारखान्याचे 'ऑडिट' करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संचालक मंडळाची बैठक घेतली.
माळेगाव कारखान्याने दोन महिन्यात सुमारे साडेचार लाख टन उसाचे गाळप केले असून १०.५१ टक्के डेची रिकव्हरी ६० कोटीपेक्षा जास्त डिस्टरलीचे उत्पन्न तसेच सहवीज निर्मितीचे ३० कोटीपेक्षा अधिक उत्पन्न यंदाच्या हंगामात कारखान्याला मिळणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने दिल्याने पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विरोधकांवर साधला निशाणा
सदर बैठकीत पवार म्हणाले की, जरंडेश्वर कारखान्याचे विस्तारीकरण साडेसात हजार टनापर्यंत असून, ३२ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचे टेंडर १४० कोटीत झाले आहे. मात्र, माळेगाव कारखान्याच्या १४ मेगावॉट वीज प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी सुमारे १८० कोटी खर्च कसा झाला? असा सवाल उपस्थित करून त्यांनी जुन्या संचालक मंडळावर निशाणा साधला. माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण नेमकेपणाने झाले असते तर मागील वर्षी रिकव्हरी घसरली नसती. शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले नसते. यावर मार्ग काढण्यासाठी यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मी स्वतः व्हीएसआय संस्थेचे तज्ञ अधिकारी यंत्र सामग्रीतील त्रुटी दूर करण्यासाठी पाठविल्याने सध्या कारखाना सुस्थितीत असल्याचे पवारांनी सांगितले.
संचालक मंडळाला केल्या सूचना
इथेनॉल निर्मितीवर भर द्या, वीज निर्यात वाढवण्याची आवश्यकता आहे, साखर विक्रीवर लक्ष केंद्रित करा, बगॅस जतन करा, उत्पन्नाच्या तुलनेत इथेनॉल स्टोरेज टॅंक वाढविणे, अधिसूचना संचालक मंडळाला पवार यांनी केल्या.