बारामती : कोरोना संसर्ग बारामती तालुक्यातही वाढत आहे. तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन’ आढावा बैठक आज (25 एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. 'बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे', असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.