उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रार्दुभाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा - ajit pawar on corona
कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती - शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही, त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
'गर्दी वाढत राहिली तर…'
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रूग्ण संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. परंतु हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रूग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथील करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहिली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जर रूग्ण संख्या 5 टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथील करता येतील. शासन व स्थानिक प्रशासन कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.’
'लसीकरणाचे योग्य नियोजन करावे'
नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री तसेच औषधे, ऑक्सिजनचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.
'तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्यूकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.