पुणे - विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या रुग्णालयाचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्यावत ठेवण्यासाठी कोविड केअर सॉफ्टवेअरचे तयार करण्यात आले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सॉफ्टवेअरचे लॉचिंग करण्यात आले.
पुण्यात विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या सॉफ्टवेअरचे लॉचिंग करण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, रुग्णालय व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर -
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. आज देखील २ हजार ६०८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४७ हजार १९० वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना सरकारकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, मंत्रीच सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले आहे. आज उपमुख्यमंत्र्यांनी कोविड केअर सॉफ्टवेयरचे लॉचिंग केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले.