पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमधील मनसेच्या नगरसेवकावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे आज (शुक्रवार) नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर उभारणीच्या कामाची पाहणी करायला आले होते. तेव्हा, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर फिजिकल डिस्टन्सिंगवरून चांगलेच भडकले. ४ मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत, थोडं लांब थांबून बोल, असे म्हणत अजित पवार चिखले यांच्यावर भडकले.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात घेता, शहरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. नेहरूनगर येथील कोविड सेंटर उभारणीची अजित पवार यांनी पाहणी केली. दरम्यान, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी शहरातील बंद असलेल्या जिमबद्दल अजित पवार यांच्याशी बोलायच होते. ते आल्यापासून चिखले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्यांदा अंगरक्षकांनी चिखले यांना बाजूला होण्यास सांगितले. परंतू, त्यानंतर अजित पवार हे मोटारीच्या बाजूला थांबले असता चिखले यांनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार हे सचिन चिखले यांच्यावर भडकले. ४ मंत्री कोरोनाबाधित आढळले आहेत, लांब थांबून बोल असे म्हणत अजित पवार त्यांच्यावर भडकले. त्यानंतर मनसे नगरसेवक तिथे थांबले नाहीत. दरम्यान, त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद येत आहे.
चिखले यांचा गैरसमज, संजोग वाघेरे यांची सारवासारव
अजित पवार हे मनसे नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर भडकले नाहीत. आम्ही तिथं होतो. अंगरक्षकांनी मागे थांबा असे म्हटले होते. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबल बोलताना सारवासारव केली. अजित पवार हे सचिन चिखले यांच्याशी नंतर बोलतो असे म्हटल्याचे वाघेरे म्हणाले. तसेच चिखले यांचा गैरसमज झाला असल्याचेही वाघेरे म्हणाले. या प्रकरणानंतर मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, काही तासांपासून त्यांचा फोन बंद येत आहे.