बारामती (पुणे)- केंद्र सरकार अतिवृष्टी झालेल्या गावांना भरघोस मदत करेलच, मात्र राज्य सरकारने तातडीने मदत करावी, राज्य सरकारची पहिली जबाबदारी त्यांची असून त्यांनी हात झटकून न टाकता तातडीने मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते.
बारामती तालुक्यातील उंडवडी येथे त्यांनी पाहणी केली, त्यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ही राजकारणाची वेळ नाही. अतिवृष्टी, पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. केंद्राकडून मदत मिळविण्याचा आम्ही सर्व तो प्रयत्न करू. परंतु राज्यानेही भरीव मदत करणे गरजेचे आहे. आम्ही दौरे जाहीर करताच राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. आम्हाला प्रत्येक शेतकर्यांच्या बांधावर जाणे जमणार नसले तरी शक्य आहे तेवढ्या व्यथा जाणून घेवू, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका ही केली.
सरकारने शेतकऱ्यांना लगेच मदत करावी
मळद गावातील ही एक वस्ती. (दौंड तालुका) पूल वाहून गेला, त्यामुळे गावाशी संपर्क तुटला. शेतीचे नुकसान जनावरं वाहून गेली... ८ दिवसांपासून वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, कुणी आजारी पडले तर दवाखान्यात जायला रस्ता नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की याची तत्काळ दखल घ्यावी, असे ही फडणवीस यावेळी म्हणाले.
बारामती विमानतळावर जोरदार स्वागत
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बारामतीतून अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायलाला सुरुवात केली. बारामती विमानतळावर फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बारामतीत त्यांच्या स्वागतावेळी आमदार राहूल कूल, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, आदी उपस्थित होते. बारामतीत फडणवीस यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. माझा दौरा पूर्ण होवू द्या, नुकसानीची पाहणी केल्यानंतर विस्ताराने बोलेन असे ते म्हणाले.