पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम दापोडी ते पिंपरी हे अंतिम टप्प्यात आहे. पिंपरी ते निगडी असा मेट्रोचा टप्पा व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड मनसे आग्रही असून शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेने 2019 ला दिली आहे निगडी मेट्रोला मान्यता
पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने मेट्रो लाइनचा पहिला टप्पा हा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पिंपरी ते निगडी प्रकल्प अहवालास मार्च, 2019 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. तो प्रकल्प अहवाल राज्य शासन व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी व मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
राज्य शासनाची मंजुरी गरजेची
या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी आवश्यक आहे. पण, ती अज्ञाप मिळालेली नाही. हा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या दरबारी पडून असून त्याचा आपण पाठपुरावा करावा व तो मंजूर करून घेण्यात यावा, असे आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
मनसेचा आंदोलन करण्याचा इशारा
सलग दोन ते चार वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना निगडीपर्यंत मेट्रो पहिल्याच टप्प्यात व्हावी यासाठी आग्रही आहे. निगडीपर्यंत मेट्रो मंजूर न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा मनसे चे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
हेही वाचा - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींचे वाजले बिगुल, पाच उमेदवारांनी भरले अर्ज
हेही वाचा - चाकण आणि वाकडमधून 13 लाख 29 हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई