पुणे: महाराष्ट्राला मोठी संत परंपरा (Saint tradition of Maharashtra) लाभली आहे. वारकरी आणि संत परंपरेत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा लौकिक मोठा आहे. संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील एक संत तसेच लोककवी होते. ते जगदगुरू म्हणूनही ओळखले जातात. वारकरी परंपरेत पंढरपुरचा विठुराया (Vithuraya of Pandharpur) हा सर्वांचे आराध्य दैवत आहे. तुकाराम महाराजांचेही आराध्य दैवत पांडुरंगच होता. अनेक अभंगाच्या माध्यमातुन त्यांनी सर्वसामान्य जनतेला इश्वर भक्तीचा पाठ दिला. वारकरी संप्रदायाची परंपरा तयार केली. सामाजिक प्रबोधनाची सुरवात करणारे सुधारक संत म्हणुन त्यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. त्यांनी वास्तवादी लिखानासोबत समाजातील दांभिकतेवर प्रहार करत आपल्या साहित्य व किर्तनाच्या माध्यमातुन समाजाला मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राच्या संत परंपरेत अभंगाला मोठे महत्व आहे. तुकाराम महाराजांच्या भाव कविता म्हणजे त्यांचे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेचे मोठे द्योतक मानले जातात. तुकारामाचे अभंग प्रसिध्द आहेत. वारकरी, साहित्यीक अभ्यासक आणि सर्वसामान्य असे सगळेच त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात. वारकरी संप्रदायात त्यांचे अभंग सगळ्यांनाच भावतात तसेच ते तोंडपाठही असतात हे पहायला मिळते. त्यांनी सोबतच त्यांनी गवळणींचीही निर्मिती केली. तुकाराम महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणुन सर्वांना मार्गदर्शन करत राहीली आहे.
संत तुकाराम महाराजांनी बहुजन समाजाला जागृत करून देवधर्माशी संबंधी मते सर्वसामांन्यांना पटवून दिले. समाजातील अनागोंदी त्याचप्रमाणे गैरप्रथा तसेच अंधश्रद्धधा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. इ.स. १६५० मध्ये ग्रामस्थ आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना विठ्ठल सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती.
तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली असे सांगितले जाते. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची परमभक्ती कायम ठेवली.
तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू केली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले. देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर कर्णे गजेंद्र भारती महाराज यांनी केले. इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णूपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. हा मराठी चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता. त्यानंतर भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट निघाले.
हा १९३६ सालचा मराठी चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर ॲन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. १९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. त्या नंतरही त्यांच्यावर वेगवेगळ्या काळात वेगवेगळे चित्रपट तसेच मालिकाही निघाली. ते अनेक भाषेतही होते. इ.स. २०१२सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे.