पुणे - स्वत:ला पुरोगामी, उदारमतवादी म्हणणारे अनेक आहेत. मात्र, त्यांनी इतरांशी केवळ मतभेद न मांडता चर्चा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. 'दकनी अदब फाऊंडेशन' तर्फे शहरात तीन दिवसीय 'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यपाल पुढे म्हणाले, भारत रत्नांची खाण आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. येथे होत असलेला महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. कलेला नवे स्वरूप येताना आपली मुळे सुरक्षित राहिली पाहिजेत. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडत असते. कलेत ताकद असते, त्याचा उपयोग कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःला उदारमतवादी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी म्हणणारे अनेक आहेत. त्यांनी इतरांशी केवळ मतभेद न मांडता चर्चा केली पाहिजे. तसेच समाज युगानुयुगे टिकण्यासाठी, एक करण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात. हे योगदान देश, जगासाठी उपयुक्त ठरू शकते. या विचारमंथनातून नवनीत पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - "सारथी संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप खोटे, कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार"
यावेळी उपस्थित दिग्दर्शक विशाल भारद्वाज म्हणाले, समाजात लिटरेचर फेस्टिव्हल होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. साहित्य, संस्कृती, कला यांचा चांगला संगम या फेस्टिव्हलमध्ये राहिला आहे. या निमित्ताने जे मंथन होईल ते समाजाला पुढे घेऊन जाईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. हा उद्धाटन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला. यावेळी दिग्दर्शक विशाल भारद्वाज, माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य, कविता, नाट्य, चर्चा अशा बहुरंगी, बहु आयामी कार्यक्रमांचे आयोजन या फेस्टीव्हलमध्ये केले आहे. फेस्टिव्हलचे हे दुसरे वर्ष आहे.
तर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळचे कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आणि दिवसभराचे कार्यक्रम नेहरू सभागृह (घोले रस्ता) येथे होणार आहेत.
विशाल भारद्वाज, आरती अंकलीकर, सुबोध भावे, डॉ. कुमार विश्वास, स्वानंद किरकिरे, अशोक नायगावकर, मुनव्वर राणा, दानिश हुसेन, निझामी ब्रदर्स, लुबना सलीम असे 25 हून अधिक कलाकार, साहित्यिक, गायक, पटकथा लेखक, कवी या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होत आहेत.