पुणे - नाशिक महामार्गवर नारायणगाव बायपासला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
जंगलात मुक्तपणे संचार करणारा बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करत भटकंती करत असतो. आज रात्रीच्या शिकारीच्या शोधात फिरत असताना पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची बिबट्याला जोरदार धडक बसली. यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर बिबट्याचे शवविच्छेदन करुन बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वनपाल मनिषा काळे यांनी दिली.
भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे रात्रीच्या वेळी बिबटे मृत्यूमुखी पडण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वन्य प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यप्रेमींमधून होत आहे.