पुणे - शहरात खवय्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने हॉटेल रेस्टॉरंट आहेत. या हॉटेल आणि रेस्टॉरंटवरून नवनवीन पदार्थ ग्राहकांना सर्व्ह केले जातात. त्यामुळे खाद्य संस्कृती जपत नवनवीन प्रयोग करणारे शहर म्हणूनही अलीकडे पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. याच पुण्यात आता एक नवीन हॉटेल सुरू झाले आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काम करणारे सर्व कर्मचारी हे 'मूकबधिर' आहेत. हेच कर्मचारी या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सेवा देत आहेत.
हॉटेलमध्ये 15 मूकबधिर तरुण-तरुणी करतात शिफ्टनुसार काम
'टेरासीन रेस्टॉरंट' वर्दळीच्या फर्ग्युसन रस्त्यावर हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावर असलेली व्यक्ती ग्राहकाला पाहून खाणाखुणा करताना दिसते. खरं तर ही व्यक्ती मूकबधिर असून हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींचे अशाप्रकारे स्वागत करत असते. या हॉटेलमध्ये स्वागतापासून ते किचन सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी मूकबधिर असणाऱ्या तरुण-तरुणींवर आहे. सामाजिक बांधीलकी जपत मूकबधिर व्यक्तींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी डॉ. सोनम कापसे यांनी हे हॉटेल सुरू केले आहे. सध्या 15 मूकबधिर तरुण-तरुणी या हॉटेलमध्ये शिफ्टनुसार काम करतात.
मेन्यू कार्डवर सांकेतिक भाषा
काहीही ऐकू तसेच बोलता येत नसताना येथील कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देतात. या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये खाद्यपदर्थ्यांच्या पुढे काही सांकेतिक भाषेची चित्रे दिली आहेत. ती पाहून ग्राहक कर्मचाऱ्याला ऑर्डर देऊ शकतो. त्यानंतर हे कर्मचारी ऑर्डर लिहून घेतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर तयार करतात. अगदी सुटसुटीतपणे ही ऑर्डर कुणीही देऊ शकेल अशा पद्धतीने हा मेन्यूकार्ड तयार करण्यात आला आहे.
कुतूहलापोटी पुणेकरही या रेस्टॉरंटला आवर्जून देताहेत भेट
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या रेस्टॉरंटला ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. येथील कर्मचारी कोरोनाचे नियम पाळून येणाऱ्या ग्राहकाला सेवा देता आहेत. यासाठी डॉ. सोनम कापसे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मूकबधिर व्यक्ती कसे काम करतात, ग्राहकांशी कसा संवाद साधतात याच्या कुतूहलापोटी पुणेकरही या रेस्टॉरंटला आवर्जून भेट देत आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत सुरू आहे हॉटेल
आम्ही हे हॉटेल सामाजिक बांधिलकी जपत सुरू केले आहे. आम्ही आमच्या हॉटेलसाठी लागणारा संपूर्ण भाजीपाला हा 250 शेतकऱ्यांकडून घेतला जातो. येथे काम करणारे 15 ते 20 मूक बधिर कर्मचारी हे महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, इगतपूरीच्या विविध ग्रामीण भागातून आलेले आहे. त्यांना याठिकाणी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्राहकांनाही नवा अनुभव मिळावा यासाठी आम्ही मेन्यू कार्ड सांकेतिक भाषेतही ठेवला आहे. मेन्यू ग्राहक व कर्मचाऱ्यांना समजण्यास सोपे आहे, अशी माहिती हॉटेलच्या मालक डॉ. सोनम कापसे यांनी दिली.
या हॉटेलमधील कर्मचारी म्हणजेच प्रेरणा देणारे
या ठिकाणी उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे. ऑर्डर करताना काहीच वेगळे वाटले नाही. जर मूक बधिर तरुण-तरुणी काम करू शकतात, तर आपण का नाही करू शकत, अशी प्रेरणा या हॉटेलच्या माध्यातून मिळते, अशी प्रतिक्रिया हॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाने दिली.
हेही वाचा - विशेष : 'पोस्को'साठी विशेष न्यायालये, मात्र अजूनही तारीख पे तारीख सुरुच
हेही वाचा - नात्यांमध्ये दुरावा.. कोरोनावर उपचार घेऊन परतलेल्या आईला घरात घेण्यास मुलगा व सुनेचा नकार