पुणे - पत्नी आणि मुलाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी आबिद शेखचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील खानापूर गावाजवळ आढळून आला आहे. अबिद शेख हा मंगळवारपासून बेपत्ता होता. भारती विद्यापीठ आणि सासवड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आबिद अब्दुल शेख (वय 38) हा बेपत्ता होता. तर आयान आबिद शेख (वय 7) आणि आलीय आबिद शेख (वय 35) अशी खून झालेल्या माय-लेकाची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खानापूर गावाजवळील नदीत एक अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता हा मृतदेह पुण्यातील दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी अबिद शेख याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाला आहे. दरम्यान अबिद शेख यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
काय आहे प्रकरण..
मंगळवारी (15 जून) सासवड परिसरातील खळद गावाजवळ आलिया शेख तर पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळ अयान शेखचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्यांना सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर ब्रिझा कार सापडली होती. बेपत्ता असलेल्या आबिद शेख याने 11 जून रोजी ही कार भाड्याने घेतली होती. ही कार घेऊन तो आलिया आणि अयान यांच्यासह पिकनिकला गेला होता. सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला आहे.
सात पथके स्थापन
दरम्यान सातारा रस्त्यावर सापडलेल्या कारच्या दरवाज्यावर रक्ताचे सडे आहेत. कारमध्ये रक्ताळलेल्या अवस्थेत लहान मुलांच्या सँडल सापडल्या आहेत. याशिवाय खाण्याच्या वस्तू, फळे विखुरलेली आहेत. फॉरेन्सिक टीमने आज सकाळीच या गाडीतून तपासासाठी काही रक्ताचे नमुने हस्तगत केले आहेत.पुणे पोलिसांनी या प्रकरणी आबिद शेख याच्यावर संशयित आरोपी म्हणून खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याला पकडण्यासाठी वेगवेगळी सात पथके देखील स्थापन केली होती. पोलीस मंगळवारपासून कसून त्याचा शोध घेत होते. आज अखेर त्याचा मृतदेह सापडला.