पुणे- श्रीक्षेत्र नारायणपूर येथे नारायण महाराज यांच्या उपस्थित मंगळवारी दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याला भाविकांची नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे पुरंदर तालुक्यात एकमुखी दत्तमंदिर आहे. येथील दत्त जयंती सोहळ्यासाठी दरवर्षी राज्यातून तसेच परराज्यातूनही लाखो भाविक हजेरी लावतात. या वर्षी मात्र कोरोना रोगाच्या प्रार्दुभावामुळे भक्तांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी दिगंबरा..दिगंबराच्या जयघोषाने नारायणपूर नगरी दुमदुमून गेली. दत्त जन्मावेळी वैभवकाका काळे यांचे आख्यान झाले. तसेच नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, देव भेटविणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले. या सोहळ्या निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली. विद्युतरोषणाई, रांगोळ्या काढून मंदिर सुशोभित करण्यात आले होते.
हेही वाचा-कांदा निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
दत्त जयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. यंदा भक्तांची उपस्थिती कमी असली तरी उत्सवातील उत्साह कमी झालेला नव्हता. यंदाही दत्तजंयती निमित्त पारंपारिक सर्व कार्यक्रम साजरे करण्यात आले.
हेही वाचा-कोरोनाने नृसिंहवाडी दत्त जयंती यात्रा रद्द, परिसरात शुकशुकाट