पुणे - शहरात शनिवारी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी करत यात सहभाग घेतला.
शहरातील सुवर्णयुग मंडळ आणि बाबू गेनू मंडळाच्या दहीहंड्या या नागरिकांचे विशेष आकर्षण असतात. यंदा ही सुवर्ण युग मंडळाने भव्य देखावा सादर करत दहीहंडी उत्सव साजरा केला. ही हंडी पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले होते. कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदानी सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी ६ थर लावून फोडली. चांदी की डाल पर... मच गया शोर...या सारख्या गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला.
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोल्हापूर, सांगली येथे उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोतवाल चावडी येथे साध्या पद्धतीने यंदा दहीहंडी उत्सव साजरा केला. नटराज दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला सन्मानचिन्ह, गणेशाची प्रतिमा बक्षीस म्हणून देण्यात आली. सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. शहरात पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार १० कोटी रुपयांची मदत टप्याटप्याने पूरग्रस्तांना केली आहे. त्यामुळेच आम्ही देखील दहीहंडी उत्सवात देखावा व सजावटीचा खर्च टाळून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करत आहे, अशी माहिती दहीहंडी मंडळांकडून देण्यात आली.