अकोला - जिल्ह्यात २२५ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी एक असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी इच्छुकांनी कार्यालयात आज दिवसभर गर्दी केली. मात्र, जात पडताळणी कार्यालयाने यंदा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र खिडकी न केल्याने इच्छुक उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोवीडमुळे सहा ते सात महिने लांबलेला ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांमध्ये आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी एकच धांदल उडली आहे. यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा पडताळणी कार्यालयात आज नागरिकांनी एकच गर्दी केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज २३ पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव सादर केल्याची पावती सादर करणे अत्यावश्यक आहे.
निवडणूकींच्या प्रस्तावाला स्वतंत्र खिडकी हवी -
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणी कार्यालयात एकच गर्दी केल्याने कोवीड चे सर्व नियम पायदळी तुडवले. मात्र, निवडणूकींच्या तोंडावर दरवर्षी स्वतंत्र खिडकी करणारा विभाग यंदा मात्र कोरोनातही हलगर्जीपणा करतांना दिसत असल्याने याठिकाणी शैक्षणिक प्रस्ताव सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.