पुणे - बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात चांगलाच हाहाकार माजवला. या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या पावसाचा फटका येथील शेती-भाजीपाल्याच्या पिकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे भाजीपाला व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे मोठा भांडवली खर्च करुन उभारलेली शेती आता पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. खेड आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊसाच्या सरी कोसळत आहेत. तर, काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आगमन केलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.
हेही वाचा - पावसाचा हाहाकार; पुण्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू
शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला असताना परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २ ते ३ दिवसापासून येणाऱ्या पावसामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातील अनेक भागात शेतीत पाणी साचून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कोबी, झेंडू, भाजीपाला, तरकारीमाल तसेच केळी अशी पिके आहेत. आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची चिंता पावसाने मात्र आणखी वाढवली आहे.
हेही वाचा - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, अनेक रस्ते जलमय