पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोडमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकवणाऱ्या गुन्हेगाराला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देहूरोड पोलिसांनी जप्त केली आहे. विनायक भारत कोळी (वय- 26), गण्या उर्फ गणेश महावीर भुंबक (वय 23) वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरात अज्ञात आरोपी हा ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांच्या जवळील सोन्याची चेन, महागडा मोबाईल अशा मौल्यवान वस्तू मारहाण करून काढून घेतो, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास करत असताना आरोपी विनायक भारत कोळी याच्या पर्यंत पोलीस पोहचले. विनायकने चोरीचा मोबाईल लोहियानगर झोपडपट्टी गंजपेठ पुणे येथे विकल्याची माहिती दिली. त्यानुसार अधिक तपास केला असता मुख्य आरोपी गण्या उर्फ गणेश महावीर भुंबक यास अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि गुन्हयात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोफने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उप-निरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, सचिन शेजाळ, विजय गेंगजे, सुमित मोरे, यांनी केली आहे.