पुणे Cow Died In Pune : बटाट्याचा पाला खाल्ल्यानं तब्बल 20 गाईंचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथं ही घटना घडली आहे. विषबाधा झाल्यानं तब्बल 40 गाई बाधित झाल्या आहेत. त्यामुळे गाईंच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बटाट्याचा पाला खाल्ल्यानं विषबाधा : निगुडसर गावात राजस्थानी व्यावसायिकांच्या 150 पेक्षा जास्त जनावरांना बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाली. यात 20 वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या गाईंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 मोठया गाई, 4 कालवडी अश्या एकूण 20 गाईंचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर 30 ते 40 जनावरांना देखील विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या गाई दगावण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.
राजस्थानी कुटुंब गाई पाळून करतात उदरनिर्वाह : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर मेंगडेवाडी रस्त्यावर राजस्थान इथून आलेले लालगाईवाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडं 150 गाई, वासरं आहेत. राजस्थानी कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्रिकरुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
राजस्थानी कुटुंबानं बटाट्याचा आणला होता पाला : राजस्थानी कुटुंब निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पात व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांच्या गाईंना खाण्यासाठी घेऊन येतात. दोन दिवसापूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे इथल्या एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गाईंना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गाईंना विषबाधा झाली. त्यामुळे आतापर्यंत 20 गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर 30 ते 40 गाई देखील मरणाच्या वाटेवर असल्याची माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ तळेकर यांनी दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गाईंवर उपचार सुरु आहेत.
रासायनिक फवारणीमुळे विषबाधा झाल्याचा अंदाज : दुर्घटनेत राजस्थानमधील व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. बटाट्यावरील रासायनिक फवारणी आणि रोगराईमुळे विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेत पंचनामे केले आहेत. व्यापाऱ्याचं मोठं नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे. माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तळेकर यांनी दिली आहे. निरगुडसर गावचे तलाठी पी एम मुगदळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तळेकर, सरपंच रवींद्र वळसे पाटील, माजी उपसरपंच आनंद वळसे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोरके, विक्रम मेंगडे, हरिश सुडके यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पाहणी केली आहे.
हेही वाचा :