पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत पुणे महापालिकेने करार केला असून विलगीकरणाचे 500 आणि अतिदक्षता विभागातील 30 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
हेही वाचा- धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहेत. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात जागा कमी पडली. तर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना भर्ती केले जाणार आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.