पुणे- कोरोना विषाणूच्या संकटात हॉटेल्स चालक आणि मालकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 4 हजार हॉटेल्स आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने लॉकडाऊन लागू केले. शहरातील आणि परिसरातील हॉटेल्स गेल्या चार महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे तब्बल 60 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे हॉटेल्स संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभन शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
सरकारने हाॅटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पार्सलची सुविधी सुरू आहे. हाॅटेस सुरू असल्यावर जेवढा व्यवसाय होता तेवढा पार्सलवर होत नाही. त्यामुळे अशीच बंदची परिस्थिती राहिली तर हॉटेल्स चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असे हॉटेल्स चालकांनी म्हंटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने हॉटेल्स खुली करण्याबाबत निर्णय घ्यावा. केंद्र आणि राज्य शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी हाॅलेट संघटनेने केली आहे. सध्या पार्सलला मुभा देण्यात आली असली तरी ग्राहकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद नाही. त्यात हॉटेल कामगार आपापल्या मूळगावी गेल्याने कामगारांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीमध्ये हॉटेल्स खुली करण्याची परवानगी दिल्यास पन्नास टक्के हॉटेल्स उघडली जातील, असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे हॉटेल्स चालक देखील त्रस्त झाले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल्स बंद असल्याने अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, आळंदी आणि चाकण या परिसरात 4 हजार हॉटेल्स असून सर्व सूत्र पिंपरी-चिंचवड शहरातून हालतात. लॉकडाऊन झाल्यापासून हे सर्व हॉटल्स बंद असून लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर मूळगावी जाण्याची वेळ आली असून कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या राज्यसरकारने पार्सलला अटी आणि शर्तीसह परवानगी दिली आहे. मात्र, कामगार मिळत नसल्याचे हॉटेल्स मालक सांगतात.
पिंपरी-चिंचवड, आळंदी, चाकण आणि तळेगाव या परिसरात छोटे मोठे 4 हजार हॉटेल आहेत. तिथे काम करणारे कामगार हे उत्तराखंड, पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील आहेत. लॉकडाऊनमुळे कामगार गावाकडे परतले आहेत. आता शहरात केवळ दहा टक्केच कामगार उपलब्ध आहेत.
जेवणाचे दर वाढवण्याचा विचार नाही...
कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नोकरीवर गदा आली आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी असल्याने व्हेज किंवा नॉनव्हेज जेवणाचे दर वाढवण्याचा कोणताच विचार नसल्याचे हॉटेल्स संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभन शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात तब्बल एक लाख कामगार हॉटेल्समध्ये काम करतात. परंतु, लॉकडाऊन झाल्याने अनेकांवर बेरोजगारी ओढावली. त्यामुळे शासनाने अटी आणि शर्थीसह हॉटेल्स सुरू करण्याची मुभा हॉटेल्स चालकांना दिल्यास कामगारांचा तुटवाद भासणार आहे हे निश्चित!