पुणे - शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शहरात बेड उपलब्ध न झाल्याने रुग्णांनी आपले प्राण गमविल्याच्या अनेक घटना शहरात घडत आहेत. शहराबरोबर आता ग्रामीण भागातही बेड उपलब्ध न झाल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. हवेली तालुक्यातील खानापूर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीचा बेड व उपचारांअभावी घरीच मृत्यू झाला आहे. सहा तास पडून असलेल्या मृतदेहावर प्रशासनाकडून कसलीही मदत न मिळाल्यानंतर खानापूर गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी गावाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खानापूर येथील 40 वर्षीय व्यक्तीचा बेड व उपचारांअभावी घरीच तडफडून मृत्यू झाला. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत मृतदेह घरासमोरच पडून होता. प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यांनतर खानापूर गावचे सरपंच निलेश जावळकर, पोलीस पाटील गणेश सपकाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदित्य धारूरकर व गावातील तरुण ओम तिकोने यांनी पीपीई किट परिधान करून मृतावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
या 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर 2 दिवस कुठेही बेड उपलब्ध होत नव्हता. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होता. मात्र, तिथेही पैशांची मागणी होत होती. म्हणून रुग्णाला घरी परत आणण्यात आले. यानंतर त्यांचा घरीच तडफडून मृत्यू झाला. याला कारणीभूत असलेल्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानापूरचे सरपंच निलेश जावळकर यांनी केली.
पुणे शहराबरोबर आत्ता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा पद्धतीने उपचारांविना एखाद्या रुग्णाचा जीव जात असल्यास ही बाब चिंताजनक आहे. ग्रामीण भागात खासगी रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे एखाद्या रुग्णाला उपचारांविना जीव गमवावा लागत असेल तर प्रशासनाने अशा खासगी रुग्णालयावर कारवाई करणे आवश्यक आहे. पण प्रशासन ही कारवाई कधी करणार, आणखी काही जणांचे जीव अशाच पद्धतीने गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, संतप्त सवाल केला जात आहे.