बारामती(पुणे)- शहरातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका 77 वर्षीय वृद्धाला आज कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. यामुळे बारामतीतील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेले वयोवृद्ध गृहस्थ हे घरीच असतात, ते घराबाहेर पडत नाहीत,असे असतानाही त्यांना कोरोनाची लागण कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सदरच्या रुग्णाचे वास्तव्य समर्थ नगर शेजारीच असल्याने हा परिसर अगोदरच सील करण्यात आला आहे.
वयोवृद्ध रुग्णाला कोरोनाची लागण कोणाकडून झाली असावी याचा तपास केला जात आहे. बारामती शहरात कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला असून, इतर पाच जणांची प्रकृती ठणठणीत आहे. मात्र, सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा बारामतीकरांची चिंता वाढली आहे.