पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसात एकूण ९ कोरोनामुक्त व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ 3 कोरोना बाधित असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीमधील नूतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री दहा वाजता एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांची संख्या १२ होताी. मात्र, येथील डॉक्टरांना रुग्णांना ठणठणीत बरे करण्यात यश आले आहे. शहरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले. शहरात १२ कोरोना बाधित आढळल्याची माहिती शहरात आणि अवघ्या महाराष्ट्रात वाऱ्या सारखी पसरली. मात्र, डॉक्टरांनी परिश्रम घेतल्याचे स्पष्ट दिसत असून गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण ९ जणांना ठणठणीत बरे केले आहे.
रविवारी सकाळी 5 तर रात्री दहा वाजता एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती हा जपानच्या टोकियो शहरातून आला होता. त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू केले. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
9 कोरोनामुक्त व्यक्तींना घरी सोडल्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या अवघ्या ३ वर येऊन ठेपली आहे. सुरुवातीला हीच आकडेवारी १२ होती. लॉकडाऊननंतर शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक ही रुग्ण आढळलेला नाही. प्रशासन आपली चोख भूमिका बजावत आहे.