पुणे - कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. केवळ कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सामान्य नागरिक रक्तदान करण्यास धजावत नाहीत, अशावेळी ज्या रुग्णांना रक्ताची आवशयकता असते त्यांना योग्यवेळी रक्त न मिळाल्याने उपचारात अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक अशी शस्त्रक्रिया पार पडली आहे. या शस्त्रक्रियेनंतर रक्तातून कोरोना संसर्ग होत नसल्याचा दावा, या डॉक्टरांनी केला आहे.
बोन मॅरो ट्रान्सफरनंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह...
जून महिन्यात कोरोनाची आकडेवारी वाढत होती. भीतीच्या सावटाखाली सर्वजण वावरत होते. या काळात रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी लोक घाबरत होती. याच काळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ५५ वर्षाच्या कर्करोगाच्या रुग्णाला किमोथेरपी नंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे होते. यासाठी डोनर त्यांचा मुलगा होता. मात्र, हाच मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांसमोरही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मोठी जोखीम पत्करून डॉक्टरांनी पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीचा बोन मॅरो रुग्णाला ट्रान्सफर केला. यानंतरही या रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली होती.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ४,९२२ नवीन रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू
...म्हणून रक्तदात्यांनी पुढे यावे -
या शस्त्रक्रियेला तब्बल ६ महिने उलटले आहेत. रुग्ण आणि त्यांचा मुलगा (डोनर) हे दोघेही व्यवस्थित आहेत. अद्याप रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे रक्तातून कोरोनाचे विषाणू संक्रमित होत नाहीत, असा दावा मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी काहीही धोका नाही. रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी -
दरम्यान, राज्यात आज (शनिवारी) ४,९२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४७,५०९ वर पोहचला आहे. तसेच राज्यात आज ९५ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,६९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८२,८४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.