पुणे - शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. जुन्नर तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जुन्नर तालुक्यातील १४ जणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अनेकांना संकटात पाडू शकतो, अशी भीती खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी व्यक्त केली.
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात मुंबईवरून एक व्यक्ती आली असताना तिचा या परिसरातील अनेकांशी संपर्क आला. त्यातून ही लागण झाली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत पुणे, मुंबई परिसरातून अनेक नागरिक आपल्या मूळगावी वास्तव्यासाठी आले आहेत. या लोकांनी स्व:त 'होमक्वारंटाईन' करून घेण्याची गरज असताना ते अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मंगळवारी राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ७२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३०२ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक ५९ नवे रुग्ण आज आढळून आले. तर पुणे, वाशी, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी दोन तसेच वाशी आणि विरार येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला. तसेच, अहमदनगरमध्येही तीन नवे रुग्ण आढळले आहेत.