पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका वर्षाच्या चिमुकल्याला कोरोनाची बाधा झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आज आलेल्या अहवालात एकूण चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात चिमुकल्याचाही समावेश आहे. तर खडकी येथील ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. आत्तापर्यंत ३१ जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ११० वर पोहचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत ३१ जण कोरोनामुक्त झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूने शहरात थैमान घातले असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज चार कोरोनाबाधित आढळले असून यात एका वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. इतर कोरोनाबाधितांचे वय ९, १९ आणि ३० अशी आहेत. हे सर्व थेरगाव, रुपीनगर देहूरोड, रविवार पेठ, पुणे स्थानक येथील आहेत.
दरम्यान, खडकी येथील ५० वर्षीय महिलेवर गेल्या काही दिवसांपासून महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ३ तर इतर परिसरातील २ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. हे सर्व पाहता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.