पुणे - पंढरीची वारी आहे माझ्या घरी..! आणिक न करी तीर्थव्रत... असा हा आषाढी वारी सोहळा संयमित करण्यासाठी वारकरी सकारात्मक आहेत. मात्र, पालखी सोहळा तोंडावर आलेला असताना कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने आषाढी वारीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून स्पष्ट सूचना मिळत नसल्याने पालखी सोहळा प्रमुखांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट राहील हे स्पष्ट आहे. त्या पद्धतीने आतापासूनच तयारी करावी लागेल. मात्र, पंढरपूरला नेमका सोहळा न्यायचा कसा असे अनेक प्रश्न दिंडी सोहळा प्रमुखांकडुन विचारले जात आहेत. महाराष्ट्रभरातून छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. परंतु, एवढे भव्यदिव्य स्वरूप या वर्षी करता येणार नाही याची वारकरी संप्रदायाला कल्पना आहे. मात्र, याबाबत शासनाने प्रमुख सोहळा प्रमुख आणि दिंडी मालकांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी प्रमुख चोपदार रामभाऊ यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसे स्वरूप असणार याबद्दल वारकरी संप्रदायाला उत्सुकता आहे. माऊलींचा हा पालखी सोहळा 39 दिवसांवर आला आहे. मुक्ताईचा पालखी सोहळा 22 दिवसांवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेत आषाढी वारीबाबत स्पष्टता लवकर जाहीर करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातुन केली जात आहे.