पुणे - शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, त्याचबरोबर कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमालीची वाढली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 4 हजार 348 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दररोज दीडशे ते दोनशे रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे.
सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाचे 2 हजार 389 सक्रिय रुग्ण आहेत. तर 352 कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंत मृत्यू झाला. मागील काही दिवसात पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील कोरोना मृत्यू दर 14 टक्क्यावरून 5 टक्क्यावर आला आहे. अजून 15 दिवसांनी हाच दर 4.5 टक्क्यावर येईल. सध्या गंभीर रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मृत्यू दर आणखी कमी होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींचीच तपासणी करण्यावर भर दिल्याचे गायकवाड म्हणाले. कन्टेन्मेंट झोनमधील सर्व्हेचा पाचावा राउंड सुरू आहे. यादरम्यान सरसकट तपासणी न करता फक्त 60 वर्षावरील नागरिक, गरोदर महिला आणि आजार असलेल्या व्यक्तींचीच तपासणी करण्यावर भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनासोबत जगणे म्हणजे...
शहरातील जनजीवन पुन्हा सुरू होत आहे. रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नवीन रुग्ण शोधून त्यांना उपचार देऊन बरे करणे, ही प्रकिया म्हणजेच कोरोनसोबत जगणे होय. याच पद्धतीने आपल्याला कोरोनावर मात करता येईल.
रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला -
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट होत होती. नंतर सहा दिवसांनी, आठ दिवसांनी, आणि त्यानंतर 15 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. यावरून कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम सकारात्मक होत असल्याचे स्पष्ट होत आहे, गायकवाड यांनी सांगितले
31 मे अखेर पुण्यात कोरोनाचे 9 हजार 600 रुग्ण असतील आणि 10 हजार निगेटिव्ह असतील, असा अंदाज तांत्रिक समितीने दर्शवला होता. त्यादृष्टीने 20 हजार बेडची तयारी आम्ही केली होती. सद्यस्थितीत आपल्याकडे फक्त 2 हजार 500 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे याआधी केलेली तयारी जून अखेरपर्यंत पुरेल असा विश्वासही शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.