पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे. ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमाक बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर केले जाईल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरीप पीक आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील बाजारपेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाईल. तसेच कृषी विभागाने यापूर्वीच शेतकऱ्यांना सूट दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आणखी सहकार्य करणार. एखादा शेतकरी शहरातून ग्रामीण भागात पेरण्यासाठी जाणार असेल तर त्यांना क्वारंटाईन भाग वगळून सवलत द्यावी, असे भुसे यांनी म्हटले.
बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई बोगस बियाणांप्रकरणी काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र, कोणी बोगस बियाणे विक्री करत असेल, वाढीव दराने बियाणे आणि खतांची विक्री करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. राज्यात बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणे दिले जात आहेत. त्यामुळे एका गोणीमागे 10 ते 30 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. राज्यात मुबलक बियाणं आणि खात उपलब्ध आहेत. युरिया 50 हजार मेट्रिक टन बफार स्टॉक केला जाणार आहे. त्यामुळे बियाणे आणि खतासाठी शेतकऱ्यांना अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन, तूर, कांदा, मका, ज्वारी खरेदीचा आढावा घेतला. 15 जूनपर्यंत खरेदी पूर्ण करायची सूचना केली असून, उद्दिष्ट सफल होईल, असंही त्यांनी म्हटलं. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत काही शेतकऱ्यांना अडचणींमुळे लाभ झाला नाही, अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार आहे. काही ठिकाणी 50 टक्केपर्यंत तर काही ठिकाणी 10-15 टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 30 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या दोन लाखांच्या आतील हे शेतकरी आहेत. 19 लाख शेतकऱ्यांचे 12 हजार कोटी रुपये खात्यावर वर्ग झालेले आहेत. 11 लाख शेतकऱ्यांचे साडेनऊ हजार कोटी रुपये लॉक डाऊनमुळे थांबलेले होते. मात्र, लॉकडाऊन थांबल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. या शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे सरकार भरणार आहे. त्यांना पिककर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.