पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या अशा विधानामुळे आज प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील (Rohan Suravase Patil) यांच्या माध्यमातून दिवाळी निमित्ताने खुळखुळ्याच बॉक्स बावनकुळे यांना पाठविण्यात आला आहे.
![बावनकुळेंना दिली खुळखुळ्याची भेट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-04-chandrashekhar-bavankule-diwali-bhet-avb-7210735_21102022111658_2110f_1666331218_277.jpg)
काय म्हणाले रोहन सुरवसे? : चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास अधिकारी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आहेत. ते जे विधान करत आहेत त्या विधानात कोणतेही तथ्य नाही. त्यांच्याच पक्षातील नेते त्यांच्यावर हसतील असे विधाने त्यांनी करू नये. त्यांनी यंदा दिवाळीत खुळखुळा वाजवत बसावं म्हणून आम्ही त्यांना दिवाळी भेट म्हणून खुळखुळे देत आहेत, असा चिमटा रोहन सुरवसे पाटील यांनी काढला आहे.
कोल्हापूर, पंढरपूर विधानसभेच्या वेळी तुमची संस्कृती कुठे गेली होती? : अंधेरी पोट निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकणार होतो. एखाद्याचे निधन झाले असेल तर आणि त्यांच्या परिवारातील सदस्य निवडणूक लढवत असेल तर भाजप उमेदवार देत नाही ही आमची संस्कृती आहे, असे बावनकुळे म्हणाले होते. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहन सुरवसे म्हणाले की, बावनकुळे साहेब हे चार दिवस झाले प्रदेश अध्यक्ष आहेत. या आधीचा इतिहास त्यांना माहीत नसावा. कोल्हापूर उत्तर विधानसभा, पंढरपूर विधानसभेच्या वेळी तुमची संस्कृती कुठे गेली होती. आता अंधेरी पूर्व विधान सभेच्या वेळी पराभवाच्या भितीमुळे त्यांची संस्कृती जागी झाली.
![बावनकुळेंना दिली खुळखुळ्याची भेट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-04-chandrashekhar-bavankule-diwali-bhet-avb-7210735_21102022111658_2110f_1666331218_332.jpg)