पुणे : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमैया यांच्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. किरीट सोमैया हे आज दौऱ्यावर असताना काँग्रेसने सोमैयांविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी किरीट सोमैया यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. पुण्यातील गजानन महाराज मंदिर चौकात 'सोमैया गो बॅक' असे फलक घेऊन काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.
सोमैया यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओने गदारोळ : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमैया यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओने मोठा गदारोळ माजवला होता. अधिवेशनात विरोधकांनी आक्षेपार्ह व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सोमैया पुणे दौऱ्यावर आले आहेत.
सोमैया गो बॅकच्या घोषणा : पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘सोमैया गो बॅक’चे फलक घेऊन निदर्शने करून सोमैया यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवले. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन करण्यासाठी थांबले होते. किरीट सोमैया यांच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, किरीट सोमैयांच्या गाडीकडे धावत कार्यकर्त्यांनी 'सोमैया गो बॅक'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोमैयांची सखोल चौकशी : माजी खासदार किरीट सोमैया यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी विरोधकांनी किरीट सोमैया यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमैया यांची सखोल चौकशी करण्यात येईल असे म्हटले होते.
हेही वाचा - kirit somaiya viral video : राज्यात किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओनंतर संतापाची लाट; पहा व्हिडिओ