पुणे: राज्यात चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कसबा पेठ मतदारसंघात मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासभेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कसबा विधानसभा क्षेत्र हे मोदी सत्तेला घालवण्यासाठी उठाव करणारे देशातील पहिले ठिकाण ठरेल, असा विश्वास पटोले यांनी आज कसबा पेठ निवडणूक प्रचारसभेत व्यक्त केला.
जनता धडा शिकवेल: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, कसबा पोटनिवडणूकीसाठी 2 तारखेला असलेले निवडणुकीमध्ये भाजपचे घमंड उतरेल व जनतेचा विश्वासघात व दिशाभूल करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. महापुरुष जुनी झाली त्यांना विसरायला सांगणारे मंडळी नखाऱ्या अर्थाने विसरण्याची आता वेळ आली आहे. व्यवस्था संपवण्यासाठी सर्व बहुजन व ओबीसी मध्ये वज्रमुठ आवळून निर्धार करावा, असे त्यांनी म्हटले.
विजय वडेट्टीवारांची टीका: माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, ओबीसी व बहुजनांचे महापुरुष इतिहासातून हद्दपार करून रामदेव बाबा, आसाराम बापू अशा बाबा-बापूंचे महत्त्व व स्थान वाढवण्याचे भाजपाचा छुपा अजेंडा असून कसब्यातील जनतेने तो वेळीच लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचार सभेचे आयोजन: कसबा विधानसभा पोटनिवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथील त्वष्टा कासार समाज मैदानात झालेल्या ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, डॉ. विश्वजीत कदम, बाळासाहेब शिवरकर ,आमदार शिरीष चौधरी, संग्राम थोपटे, माजी आमदार दीप्ती चवधरी, पुणे शहर शिवसेनेचे नेते गजानन थरकुडे, माजी महापौर रजनी त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते रुपाली ठोंबरे, काँग्रेस पक्षाचे ओबीसीचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, शिवसेनेचे गजानन पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलच्या पूजा काटकर, नाभिक समाजाचे प्रमुख गजानन पंडित,ओबीसी महासंघाचे प्रमुख भानुदास माळी, शिवसेनेचे निलेश राऊत, तांबट समाजाचे जितेंद्र निजामपूरकर, लोणारी समाजाचे सिताराम खांडेकर, वंजारी समाजाचे सुभाष थोरवे आदींसह ओबीसी वर्गातील 32 समाजाचे प्रमुख पदाधिकारी व स्त्री-पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: Ambadas Danve Critics: भाजपचे तळवे चाटणाऱ्यांनी सावरकरांना भारतरत्न मिळवून द्यावा; दानवे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना खोचक टोला