पुणे- पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आज (7 जून) काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलने केली. पुण्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील 35 ठिकाणी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकातील पेट्रोल पंपाबाहेर टांग्यात बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल-डिझेल दर कमी झालेच पाहिजेत, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
'मोदी सरकार उद्योगपतींना पाठीशी घालतंय'
'आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. तरीही केंद्रातील मोदी सरकार दिवसेदिवस इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करत आहे. पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये झाले आहे. मोदी सरकार हे या देशातील उद्योगपतींना पाठीशी घालत आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे', अशी टीका यावेळी मोहन जोशी यांनी केली.
'जाणूनबुजून मोदी सरकार सामान्यांना त्रास देतंय'
'राज्यात काँग्रेसच्या वतीने या इंधन दरवाढीविरूद्ध 1000 ठिकाणी आंदोलने होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत, तरीही मोदी सरकारने जो पेट्रोल-डिझेलवर टॅक्स लावला आहे. तो त्वरीत मागे घ्यावा. जोपर्यंत पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी होत नाही. तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करतच राहणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. त्यात मोदी सरकार महागाईचा भडका करून जाणूनबुजून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहे', असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.
'दरवाढ कमी करा, अन्यथा ...'
'पेट्रोल-डिझेलच्या दराने शतकी वाटचाल केली असताना केंद्र सरकार सातत्याने किंमतीत वाढ करत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. आता कुठेतरी अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. गेली दीड वर्षे लॉकडाऊनने मोठे नुकसान सर्वसामान्य नागरिकांचे झाले आहे. त्यात दररोज मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. केंद्र सरकारने येत्या काळात जर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन करू', असा इशारा यावेळी मोहन जोशींनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा