पुणे - मोदी पाकिस्तानला घरात घुसून मारतात. मात्र, सुप्रिया सुळे आमच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर आणि रामदास आठवले यांनी खडकवासल्यात सभेला संबोधित केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खेळाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या कर्णधाराने मैदान सोडले आहे. त्यांनतर त्यांनी प्रचार करण्यासाठी भाड्याने लोक बोलवली आहेत. त्यादिवशी राज ठाकरे म्हणाले की, मी मार्ग काढत पुण्यात आलो. मात्र, पुण्याची ही परिस्थिती ज्यांनी केली त्यांच्या बरोबरच तुम्ही आज काम करत आहात, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
सध्या महाराष्ट्र बाजूला राहिला आहे. पवारांना काय करावे हे कळत नाही. त्यामुळे पवार साहेब मोदींच्या बेटी बचावच्या धर्तीवर स्वतःसाठी बेटी बचाव मोहिम राबवताना दिसत आहेत. दरम्यान, मोदी पाकिस्तानला घरात घुसून मारतात. मात्र, सुप्रिया सुळे आमच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देत आहेत. मोठ्या माणसाने तोल सांभाळून बोलले पाहिजे. निवडणुकीत जिंकणे - हरणे हे चालूच असते, हे त्यांना समजायला पाहिजे, असे फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, भाजपचे खासदार संजय काकडेंची मध्यंतरी थोडी गडबड चालली होती. मात्र, मी त्यांना सांगितले की मी तिकडून आलो आहे. तिकडे काही मिळणार नाही. त्यामुळे ते भाजपमध्येच थांबले आहेत.