पुणे - छोटा राजन टोळीतील सराईत गुंड अजय सुभाष चक्रनारायण आणि पुण्यातील गजा मारणे टोळीतील गुंड जमीर मोहिद्दीन शेख या दोघांना पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून अटक केली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून २ पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. पौड रोडवरील साई पॅलेस बारजवळ ते संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली.
अजय चक्रनारायण (वय २३) हा राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन टोळीचा सक्रिय सदस्य आहे. तसेच छोटा राजन टोळीशी संबंधित महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना कोथरूड विभागचा तो अध्यक्ष आहे. तर जमीर शेख (वय २६) हा गजा मारणे टोळीतील सदस्य असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. या दोघांवरही कोथरूड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे कशासाठी जवळ बाळगली, त्यांच्याजवळ आणखी शस्त्रसाठा आहे का, त्यांनी काही शस्त्रे विकली आहेत का, त्यांचे इतर साथीदार कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत. आज त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश ए. एस. मतकर यांनी दिले.