पुणे : राज्यात सध्या विधानसभेसाठी कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून आश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून उमेदवार नाना काटे तर अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे हे या पोटनिवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतून राहुल कलाटे यांनी बंडोखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे या पोटनिवडणूकीत तिरंगी लढत रंगणार आहे.
असा आहे इतिहास : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी 2,50,723 मते मिळवत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव केला होता. यावेळी राहुल कलाटे यांना 1,12,225 मते मिळाली होती. तसेच 2014 मधील विधानसभा निवडणूकीत भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप हेच विजय झाले होते. लक्ष्मण जगताप यांनी 1,23,786 मते मिळवत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव केला होता. राहुल कलाटे यांना तेव्हा 6,34,89 मते मिळाली होती. चिंचवड मतदारसंघ 2008 मध्ये निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून दिवंगत उमेदवार लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. लक्ष्मण जगताप यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी दोन वेळा भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2009 ते 2019 या कालावधीत एकूण 5 महिला उमेदवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली पण एकही विजयी होऊ शकला नाही.
चिंचवड मतदारसंघ : पिंपरी-चिंचवड परिसराला ‘डेट्रॉईट ऑफ द ईस्ट’ असेही म्हटले जाते. चिंचवड हे मोठ्या, मध्यम आणि लहान क्षेत्रातील 4000 हून अधिक औद्योगिक युनिट्सचे ठिकाण आहे. चिंचवडमध्ये देशातील काही नामांकित MNCs आणि कंपन्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे हे भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक मानले जाते. यामुळे मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे औद्योगिक शहर बनले आहे. चिंचवड मतदारसंघाची 2008 मध्ये निर्मीती करण्यात आली. 2009 ते 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघातून 01 क्रमांकाचा पक्ष म्हणून कामगिरी बजावली आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक : भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे वयाच्या 59 व्या वर्षी दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांनी 3 जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला होता. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्ते तसेच पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केले. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केले होते. त्यांची कर्तव्यनिष्ठा पाहून जगताप यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावून गेले होते.
बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न अयशस्वी : कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न राज्यातील महत्वाच्या नेत्यांकडून सुरू होते. पण सुरूवातील भाजपने या निवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केला आणि यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला. दरम्यान, या पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीतून बंड पुकारले व पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध न होता त्यासाठी आता मतदान होणार आहे.
पोटनिवडणूकीसाठी मतदान व निकाल : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची 2023 मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल 2 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहेत.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जाहीर | 31 जानेवारी 2023 |
अर्ज दाखल करण्याची मुदत | 7 फेब्रुवारी 2023 |
अर्जांची छाननी | 8 फेब्रुवारी |
अर्ज मागे घेण्याची मुदत | 10 फेब्रुवारी |
मतदान | 27 फेब्रुवारी |
निकाल | 2 मार्च |
हेही वाचा : Kasaba Peth ByElection 2023 : कसबा पेठ पोटनिवडणूक; मतदारसंघाचा असा आहे इतिहास...