पुणे - दौंड तालुक्यातील केडगाव येथील ग्रेट स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशी झाडांच्या बिया गोळा केल्या. यात बहावा, कांचनार, चिंच, कवठ, बेलाच्या बिया गोळा करण्यात आल्या. चिमुकल्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. गोळा केलेल्या बियांपासून बीजरोपण करून रोपे तयार करण्यात येणार आहेत. ही रोपे 'एक मित्र एक वृक्ष' या ग्रुपला वृक्षारोपण करण्यासाठी देण्यात येणार आहेत.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्या; चित्रा वाघ यांची मागणी
देशी झाडांना प्राधान्य
आयुर्वेदिक उपयोग करण्यासाठी देशी झाडांनाच प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षक गणेश घुगे, समाधान दाणे, आकाश कसबे यांनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह देशी झाडांच्या बिया गोळा केल्या. देशी झाडांना मोठ्या प्रमाणावर बिया येतात. 'एक मित्र एक वृक्ष' या ग्रुपने परिसरातील देशी झाडांच्या बिया गोळा करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत परिसरातील देशी झाडांच्या बियांचे संकलन करण्यात आले.
चिमुकल्यांनी घेतले विशेष परिश्रम
बिया संकलन करत असताना झाडांचे महत्व, त्यांचे आयुर्वेदिक उपयोग यावेळी विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. पाच हजार बिया गोळा करून त्यापासून रोपे व सीड बॉल तयार होणार आहे. आर्यन शेलार, रोहन गायकवाड, इजाज शेख, हर्षवर्धन खुळे, साक्षी बिसेन, सानिया डफेदार, राणी सक्करवाल या चिमुकल्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सीड बॉलमुळे पर्यावरण रक्षणासाठी मदत
कराटे क्लासेसमध्ये आम्ही स्वयम संरक्षणाचे धडे शिकतो. आज निसर्गात फिरत असताना बीज संकलनातून पर्यावरण संरक्षणाचासुद्धा धडा मिळाला. घरी आणलेल्या फळांच्या बिया आपण टाकून देतो, पण त्याच बियांपासून आपण घरी रोपे तयार करू शकतो किंवा त्यांचे सीडबॉल करून निसर्गात टाकल्यास नक्कीच पर्यावरण वाचविण्यास हातभार लागू शकतो, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालणारे कोरोना योद्धे झाले बेरोजगार!