पुणे - कोथरूड परिसरातील त्रिमूर्ती कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील ११ फूट खोल पाण्याच्या टाकीत पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात सत्यवान दामोदर तोंडे यांनी फिर्याद दिली असून बांधकाम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पिनाक सत्यवान तोंडे असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
कोथरूड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की त्रिमूर्ती कॉलनीत एका घराचे बांधकाम सुरू आहे. याकरता ११ फूट खोल पाण्याची टाकी खोदलेली आहे. या टाकीवर कुठल्याही प्रकारचे झाकण ठेवण्यात आले नव्हते. घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पिनाक हा मित्रांसोबत लपाछपी खेळत होता. रात्री अंधार असल्यामुळे त्याला काही अंदाज आला नाही. त्यामुळे तो उघड्या टाकीत पडला.
बराच वेळ झाल्यानंतर पिनाक दिसेना म्हणुन त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. पिनाक सापडला नाही. काही वेळानंतर कुटुंबीयांना तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटना आईला समजताच तिने हंबरडा फोडला. एकुलत्या एक पिनाकच्या दुदैर्वी मृत्यू झाल्यामुळे तोंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अक्षम्य हलगर्जीपणा करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. बांधकाम करत असताना कामगारांची लहान मुले खेळत असतात, हे माहीत असतानाही त्यांच्या जीविताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेतली नाही, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.