पुणे - राज्य सरकारने 15 एप्रिल रोजी 15 एप्रिल ते 1 मे कडक संचारबंदी लागू केली होती. यात रिक्षा व्यवसायाला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, या परवानाधारक रिक्षा चालकांना राज्य सरकारच्यावतीने पंधराशे रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या आर्थिक पॅकेजला आज एक महिना होत आले आहे, मात्र, अजूनही या परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाही. राज्य सरकारने आम्हाला जाहीर केलेली मदत लवकर आमच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी पुण्यातील काही रिक्षाचालकांनी केली आहे.
'वर्षभरात पहिल्यांदाच मदत जाहीर'
गेल्यावर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आम्हा रिक्षा चालकांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. पहिल्या लॉकडाऊनपासून ते आत्तापर्यंत कोणीही आम्हा रिक्षा चालकांना मदत जाहीर केलेली नाही. आत्ता पहिल्यांदाच सरकारकडून आम्हाला मदत जाहीर करण्यात आली आहे. जी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. ती थेट खात्यात जमा होणार होती. पण ती अजून जमा झालेली नाही. आम्हालाही माहीत आहे की, ही रक्कम तुटपुंजी स्वरूपातील आहे, पण जी काही मदत जाहीर झाली आहे ती योग्य असून ती लवकर जमा व्हायला हवी, अशी अपेक्षा यावेळी रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.
'ग्राहक नाही आणि कारवाई देखील सुरू'
राज्य सरकारच्यावतीने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमच्या व्यवसायाला परवानगी असली तरीही दोन-दोन तास ग्राहक येत नाही. तीन प्रवाशी घेऊन गेले की पोलिसांकडून कारवाई होत आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊनपासून ते आत्तापर्यंत अनेक समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागत आहे. जे काही दिवसभरात भाडे मिळत आहे त्यात घर चालवायचे का बँकेत पैसे भरायचे? हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे.
हेही वाचा- नागपुरात वेश्यांसाठी पोलिसांचा मदतीचा हात, दोन वेळच्या जेवणाची केली सोय