पुणे - तीन राजे वेगळे आहेत कुठे ? सगळे एकच आहेत. तुम्हीच प्रश्न विचारून सातारा, कोल्हापूर वेगवेगळे करू लागले आहेत. सातारा, कोल्हापूर हा पूर्वीच तह झालेला आहे. वारणा तळमध्ये सातारा, कोल्हापूर एकत्र झाले आहेत. आणि हे 300 वर्षांपूर्वी झाले आहे. म्हणून आता हे वेगळे होण्याचे काहीही विषय नाही, असे मत कोल्हापूरचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - नागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे महाविकास आघाडी सरकार- उपमुख्यमंत्री
पुण्यात छावा संघटनेच्यावतीने महाएक्सपो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
महाएक्सपो मेळावा कौतुकास्पद
छावा संघटनेच्यावतीने आज जो महाएक्सपो मेळावा घेण्यात आला, तो खरच कौतुकास्पद आहे. अनेक महामंडळे वेगवेगळ्या समाजासाठी स्थापन झालेले आहेत. त्यात अण्णाभाऊसाठे महामंडळ विकाससंस्था किंवा इतर सर्वांना एकाच छताखाली आणण्याचे काम छावा संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले. असे काम आज पर्यंत कोणीही केलेले नाही, म्हणून खरच हे काम कौतुकास्पद आहे. तसेच, या महामेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू
राजाराम महाराजांनी 1925 ते 30 च्या दरम्यान कोल्हापुरात विमानतळ सुरू केले. लवकरच त्याचे नामांतरण व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. तसेच, पी.एम.ओ कार्यालयाकडेही पाठपुरावा करून लवकरच कोल्हापूर विमानतळाचे नामकरण होणार आहे.
नामांतर झाले तर त्यात चुकीचे काय?
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या विषयावरही छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले. औरंगाबादच्या नामांतरामागे राजकारण आहे का? माहीत नाही, पण संभाजीराजे यांच्या नावाने नामांतर झाले तर काय चुकीचे आहे? असे संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
सरकारने आपली बाजू जोमाने मांडावी
5 फेब्रुवारीला मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर आमचे लक्ष असणार आहे. सरकारने न्यायालयात आपली बाजू जोमाने मांडावी. आज जे मराठा युवक आंदोलन करत आहेत त्यांना विनंती आहे, की 5 तारखेला सुनावणी आहे, कोणीही जिवाला धोका होईल, असे काहीही करू नये, असे आवाहन संभाजीराजेंनी केले.
शेतकऱ्यांचा प्रश्न प्राधान्याने घ्यावा
शेतकरी हे आपले केंद्रबिंदू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न प्राधान्याने घेतला पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार कुणाचेही असो, ते महत्त्वाचे नाही. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर जे झाले ते मला माहीत नाही, पण कोणीही कायदा हातात घेऊ नये, असेही संभाजीराजे म्हणाले.
हेही वाचा - पुणे शहरावर आता 2400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर