पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ( History of Chhatrapati Shivaji Maharaj )आणि त्यावर साकारण्यात आलेल्या कथा, कादंबरी, साहित्य हा महाराष्ट्रातील कायम चर्चेचा आणि वादाचा विषय राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी करताना त्यात अनैतिहासिक, संदर्भहीन व काल्पनिक गोष्टींचा अंतर्भूत गेल्या गेल्याचा अनेक शिवप्रेमींचा आक्षेप होता. नुकताच प्रदर्शित झालेला हर हर महादेव चित्रपट आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून आत्ता शिवप्रेमी हे सहन करणार नाही. येणाऱ्या काळात जर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर इतिहासाची मोडतोड झाली तर याद राखा आत्ता गाठ माझ्याशी होणार, अशी आक्रमक भूमिका छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी घेतली आहे.
चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मराठी, हिंदी भाषेतून चित्रपटांची निर्मिती होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट आले, त्या चित्रपटांमध्ये किमान एक दर्जा, साधेपणा आणि आपलेपणा वाटायचा. परंतू अलीकडच्या काळात येणाऱ्या चित्रपटांतून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली होणारा इतिहासाचा विपर्यास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी हा खूप गंभीर मुद्दा आहे. हर हर महादेव चित्रपट आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. याबाबत आक्षेप घेण्यासाठी पुण्यात छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
सेन्सॉरबोर्डासोबत पत्रव्यवहार करणार - छत्रपती शिवाजी महाराज हे या देशातील लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय आहेत याची सर्वाना कल्पना आहे. लोकांच्या मनातील या भावनिक कोपऱ्याचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढले तर व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला खूप फायदा होईल. हे अनेक निर्माते, दिग्दर्शकांचे ठोकताळे सर्वसामान्य लोकांनाही समजतात. त्यावर आक्षेप असायचेही काही कारण नाही. परंतु आपल्या श्रद्धास्थानांना समोर ठेवून ज्यावेळी लोक चित्रपट पाहायला जातात, तेव्हा चित्रपटांतून दाखवला जाणारा इतिहास आणि वास्तविक इतिहास यात फरक असल्याचे जाणवल्यानंतर सर्वसामान्य शिवप्रेमींमधून येणाऱ्या प्रतिक्रिया साहजिक आहेत. त्यामुळे मी लोकांना आवाहन करेल की त्यांनीच ठरवावे की त्यांनी या चित्रपटांना जाऊ नये. तसेच या चित्रपटात आक्षेपार्ह असताना देखील सेन्सॉर बोर्ड ने कशी परवानगी दिली आहे. याबाबत देखील मी पत्रव्यवहार करणार असल्याच यावेळी संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
अशा पद्धतीने चित्रपटांची निर्मीती निश्चितच निषेधाची बाब - कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणे हा गुन्हा आहे. अलीकडच्या काळात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हिरकणी, फर्जद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, हंबीरराव, तान्हाजी, शिवप्रताप गरुडझेप, हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात असे काही शिवचरित्रावर आधारित चित्रपट काढण्यात आले आहेत. या चित्रपटांमध्ये कमी अधिक फरकाने इतिहासातील तथ्यांची मोडतोड केल्याचे आक्षेप शिवप्रेमींनी व्यक्त केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रामुख्याने मराठा इतिहास असल्याचे अनेक ऐतिहासिक कागदपत्रांद्वारे सहज सांगता येऊ शकते, परंतु अलीकडच्या काळात 'मराठा' या शब्दाऐवजी जाणिवपूर्वक 'मराठी' या शब्दावर भर देऊन चित्रपटांतील डायलॉग निर्माण केले जातात. ही खटकणारी बाब आहे. शिवकाळात कधीही, कुठेही मराठी लोक, मराठी लोकांचा इतिहास असे शब्दप्रयोग प्रचलित असल्याचे दिसून येत नाही. मग ऐतिहासिक विषयावरील चित्रपट बनवताना त्यातून मराठा शब्द वगळण्यामागचा हेतू काय हा प्रश्न निर्माण होतो. केवळ काही राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येयधोरणे समोर ठेवून, त्यांना पूरक होतील अशा पद्धतीने चित्रपटांची निर्मिती केली जात असेल आणि त्यातून इतिहासाचा गळा घोटला जात असेल तर ती निश्चितच निषेधाची बाब आहे.अस देखील यावेळी राजे म्हणाले.
नवीन येणाऱ्या चित्रपटातील इतिहासच बदलला - वेडात मराठे वीर दौडले सात नावाचा एक चित्रपट येत आहे. त्यामध्ये तर चक्क इतिहास घडवणाऱ्या सात मावळ्यांपैकी सहा मावळ्यांची नावेच बदलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे इतिहासाला धरून नाही. नेसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर यांच्यासोबत बहलोलखानाच्या फौजेवर तुटून पडणाऱ्या विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे या वीरांची नावे बदलून दत्ताजी पाने, जिवाजी पाटील, चंद्राजी कोठार, मल्हारी लोखंडे, सूर्याजी दांडकर आणि तुळजा जामकर अशी काल्पनिक नावे वापरल्याचे काही इतिहास अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिले आहे. ही तर सरळसरळ इतिहासाची मोडतोड आणि त्या वीरांचा अवमान आहे. तीच बाब हर हर महादेव चित्रपटाबाबत दिसून येते. अनेक अनैतिहासिक बाबी, प्रसंग या चित्रपटातून दाखवण्यात आल्याबाबत शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाच दुय्यम स्थान दिले गेले आहे. ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट बनवताना त्यात असणारी पात्रे, त्यांची वेशभूषा, त्यांचा शिरस्ता, ऐतिहासिक संदर्भ अशा बाबी विचारात न घेताच चित्रपट बनवून समाजाच्या माथी मारणे हे चुकीचे आहे. यातून केवळ छत्रपती शिवरायांचे नाही तर त्यांच्या मावळ्यांचेही अवमूल्यन होते. दिगपाल लांजेकर, प्रवीण तरडे किंवा डॉ. अमोल चित्रपटांबाबतही शिवप्रेमींमध्ये अनेक आक्षेप आहेत. त्यांनीही ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काही बाबतीत काळजी घेतली नसल्याचे शिवप्रेमींचे मत आहे. असं देखील यावेळी राजे म्हणाले.
छत्रपती संभाजीराजे यांच्या मागण्या - एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत असताना त्यातील काही बाबी या पूर्वनियोजित कटातून होत असल्याचेही येते. त्यामागे काही राजकीय किंवा व्यावसायिक भूमिका असू शकतात. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तूनिष्ठ चरित्र समोर आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमण्याची घोषणा केली होती. त्याबाबतीत लवकरात लवकर पावले उचलली जावीत, वाद विरहित अधिकृत शिवचरित्र आले तर अनेक प्रश्न सुटू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. चित्रपटातून त्यांची बदनामी करणे हा देशद्रोह आहे. असा गुन्हा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी. ऐतिहासिक विषयावरील चित्रपटाच्या कथा, पटकथा मंजूर करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डानि त्या इतिहासकारांच्या समितीकडे पाठवून त्यातील संदर्भ तपासून घ्यावेत आणि मगच त्यांना मंजुरी द्यावी. चित्रपटामुळे वाद होऊ नयेत आणि सामजिक तेढ किंवा संघर्ष होऊ नयेत, यासाठी निर्माते, दिग्दर्शक यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सामजिक संघटना, इतिहास अभ्यासक यांना विश्वासात घेऊन चित्रपट दाखवावा आणि त्यांच्या सूचना असतील त्या विचारात घ्याव्यात. सेन्सर बोर्डाने हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शक यांना नोटीस काढून इतिहासाच्या मोडतोडीबाबत जाब विचारावा आणि चित्रपटातील अनैतिहासिक गोष्टी वगळण्याची सूचना करावी, अशा मागण्या यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.