पुणे - छत्रपतींच्या घराण्याबाबत काय पुरावे द्यायचे? तोंडात येईल ते बोलून चालत नाही, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती तुळापूर येथे आले होते.
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून जय भगवान गोयलच्या पुस्तकावरून वाद सुरू आहे. या प्रकरणाला हळूहळू वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणही मलीन झाले आहे. या सर्व प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
हेही वाचा - राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचे राज्यभरात पडसाद; उदयनराजे समर्थक रस्त्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरूबद्दल केलेल्या वक्तव्याचे संभाजीराजे यांनी समर्थन केले आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराराजांचे गुरू नसून महाराजांचे खरे गुरू हे तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊच आहेत, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी लाखो शंभू भक्तांनी तुळापूर येथे गुरुवारी सकाळपासून गर्दी केली होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, आमदार सिद्दार्थ शिरोळे, आमदार अशोक पवार हे या सोहळ्याला उपस्थित होते.