पुणे- शिंदे समितीला कुणबी प्रमाणपत्रे तपासण्याचं काम दिलं होतं. शिंदे समितीचं काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा कुणबी दाखले असल्याचे पाच हजार पुरावे मिळाले. त्यानंतर तेलंगणात निवडणुकीत असल्यानं शिंदे समितीला तिथं जाता आले नाही. विविध जिल्ह्यात कुणबी दाखले मिळण्याचं प्रमाण वाढलं. आम्ही पेनानं खुणा केलेली कागदपत्रे शिंदे समितीला दाखविली आहेत. शिंदे समितीचं काम संपले असून ही समिती बरखास्त करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिंदे समितीला जिल्ह्यांत जाऊन कुणबी दाखले तपासण्यास सांगितलं नव्हते. शिंदे समितीकडं निजामशाहीकडं जाऊन वंशावळी व इतर पुरावे तपासण्याचे काम होते. त्यांचे आता मराठवाड्यातील काम संपले आहे. महाराष्ट्रात सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मागणी मान्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा मागास नाही.
मराठवाड्यातील मराठ्यांना निजामशाहीच्या वंशावळीत पुरावे सापडले तर ते आपोआप कुणबी होतात. मुळात कुणबी असेल तर आधीच प्रमाणपत्रे घेण्यात येतात. मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसीमध्ये दोनशे जाती होत्या. आता ओबीसीमध्ये चारशे जाती आहेत. आम्ही कधी जातींना विरोध करत नाही. खरोखर कुणबी व ओबीसी आहेत, त्यांनी आधीच कागदपत्रे मिळविली असतात, असेही मंत्री भुजबळ यांनी म्हटलं.
पहिल्यांदा पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप-पुढे छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यावर हल्ले करण्याची धमकी दिली जात आहे.पण, पोलिसावरही हल्ले झाले आहेत. पोलीस हतबल झाल्यासारखी स्थिती आहे. कारण जखमी होऊन त्यांच्यावरच कारवाई झाली. व्यवस्थित काम केल्यानंतर जनता त्यांच्या पाठिशी असल्याचं पोलिसांना सांगणं आवश्यक आहे. अंतरवली सराटीत महिला पोलिसावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. पहिली बाजू जनतेसमोर आली नाही. त्यासाठी पोलीस अधीक्षक जबाबदार आहेत.
महिला पोलिसांवर हल्ले झाल्याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे माहिती घ्यावी. आमदारांची घरे बीडमध्ये कोणी पेटविली आहे, यासाठी माध्यमांनी शोधपत्रकारिता करावी-मंत्री छगन भुजबळ
टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी दिले प्रत्युत्तर- मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्यावर भुजबळ म्हणाले की, पोलिसांनी आपआपसात मारामारी केल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले. दुसरीकडं आरोपींना पकडले तर आमच्यावर कारवाई नको, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. जरांगे आता का पलटत आहेत? माझा मराठा समाजाला नव्हे झुंडशाहीला विरोध आहे. छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी राज्यांची गादीवर बसले आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना न्याय द्यायला हवा, अशी अपेक्षा आहे. प्रकाश आंबेडकरांना हात जोडून विनंती आम्हाला सहकार्य करा. मी प्रकाश आंबेडकरांना काहीही बोललो नाही. मी पक्षाची नाही, ओबीसी मागासवर्गीय समाजाची बाजू मांडली आहे.
हेही वाचा-