पुणे : राष्ट्रवादीतून सत्तेत सहभागी झालेले मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मला सुपारी मिळाली आहे, असे फोनवरून या व्यक्तीने धमकावल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. छगन भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ उडाली आहे. याची ऑडिओ क्लिपसुद्धा आता समोर आली आहे. छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या प्रशांत पाटीलला महाडमधून पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दारु पिऊन भुजबळांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भुजबळ यांना धमकी देणारा प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याने महाडमधून फोनवरुन छगन भुजबळांना धमकी दिली होती.
छगन भुजबळ यांना धमकी : छगन भुजबळ हे पुण्यात असल्याने पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्यादिवसापासून छगन भुजबळ यांनी त्यांचे 'राजकीय गुरु' शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवारांनीसुद्धा छगन भुजबळ आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात भुजबळ प्रतिनिधीत्व करत असलेल्या येरवडा मतदारसंघातून केली. येवला येथे झालेल्या सभेत पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. थोरले पवार विरुद्ध भुजबळ यांच्यामधला संघर्ष मोठा होणार, असे चित्र दिसत असतानाच छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात लावले गेले असते. पण तूर्त पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने दारू पिऊन धमकी दिली आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.
प्रशांत पाटील नावाच्या तरुणाचा फोन : मंत्री छगन भुजबळ हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी होता. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर प्रशांत पाटील नावाच्या तरुणाचा फोन आला. त्याने भुजबळ यांचे नाव घेत, मी तुमची सुपारी घेतली असून उद्या मी तुम्हाला मारुन टाकणार आहे, अशी थेट धमकी दिली. ही माहिती तातडीने पुणे पोलिसांना देण्यात आली.
कृत्य दारूच्या नशेत : जेव्हा धमकीचा कॉल आला तेव्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तांत्रिक तपास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाला महाडमधून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. आरोपी तरुण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी आहे. तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि धमकीचा फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
- chhagan bhujbal Reaction: ...त्यांनी जे केले तेच मी केले, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
- Maharashtra Political Crisis: आमदार सरोज अहिरे कोणाच्या सोबत? खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ मंत्री भुजबळांनी घेतली भेट
- NCP Political Crisis : जे झाले, ते घरातूनच झाले; भविष्यात तेलगीप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार, छगन भुजबळांचा शरद पवारांना इशारा