पुणे - बेरोजगार तरुणांना पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका अरोपीला अटक केली आहे. सतीश वसंत लालबिगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद एकनाथ शिंदे (वय २७) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद शिंदे हा पदवीधर असून तो बेरोजगार आहे. त्यामुळे आरोपी सतीश लालबिगे याने पुणे महानगरपालिकेत रिक्त जागेसाठी भरती करण्यात येणार असल्याचे प्रमोदला सांगितले. तसेच या नोकरीसाठी आरोपीने प्रमोदकडून वेळोवेळी असे मिळून ११ लाख रुपये घेतले. मात्र, अनेक दिवस उलटूनही नोकरी मिळत नसल्याने याबाबत प्रमोदने लालबिगेला विचारणा केली. त्यावेळी त्याने टाळाटाळ सुरु केली.
लालबागेने प्रमोदसह ५ ते ६ युवकांकडून लाखो रुपये घेऊन नोकरी न देता फसवणूक केली आहे. त्यामुळे लालबिगेवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सतीश लालबिगे याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.