पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 8 वर्षानंतर पाच आरोपींविरुद्ध बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) पुणे सत्र न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. पाचपैकी चार आरोपींविरुद्ध युएपीए कायद्यानुसार खटला चालविण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यावरुन त्यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचने, असे आरोप निश्चित करण्यात आले आहे.
विरेंद्र तावडे (कटाचा सूत्रधार), सचिन अंदुरे (दाभोलकरांचा मारेकरी), शरद कळसकर (दाभोलकरांचा मारेकरी), विक्रम भावे (हत्येच्या कटात सहभाग) या चार आरोपींविरुद्ध युएपीए कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तर या प्रकरणातील पाचवा आरोपी सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर याच्याविरुद्ध हत्येसाठी वापरलेली शस्त्रे नष्ट करण्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला होणार असून या प्रकरणातील साक्षीपुरावे तपासण्यास सुरुवात होणार आहे.
आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी
लवकरात लवकर सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा व्हावी. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जो कोणी मुख्य आरोपी आहे त्यांनाही पकडण्यात यावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख यांनी केली आहे.
येत्या 30 सप्टेंबरला पूढील सुनावणी
सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले होते. आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले होते. आज (बुधवार) झालेल्या सुनावणीत न्यायालयातर्फे दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. पुढील सुनावणी ही 30 सप्टेंबरला होणार आहे.
हेही वाचा - पुणे : मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला; भिडे पूल वाहतुकीसाठी बंद...